‹ सर्व आरत्या
श्री महागणपतिपूजन
श्री गणेश

श्री महागणपतिपूजन

गणेश स्थापना संपूर्ण विधी · 10 श्लोक
श्री महागणपतिपूजन
प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार ताम्हण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.
ध्यान
नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावेत आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे अन् पुढील श्लोक म्हणावा. वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
आवाहन
उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ म्हणतांना त्या श्रीफळरूपी श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात. श्रीमहागणपतये नमः । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ।।
आसन
उजव्या हातात अक्षता घेऊन ‘समर्पयामि’ म्हणतांना त्या श्री महागणपतीच्या चरणी वहाव्यात. श्री महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।। चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना ‘समर्पयामि’ हा शब्द उच्चारत कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत. श्री महागणपतये नमः । चन्दनं समर्पयामि ।। (गंध लावावे) ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां समर्पयामि ।। (श्री महागणपतीच्या चरणी हळद वहावी) ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । कुङ्कुमं समर्पयामि ।। (श्री महागणपतीच्या चरणी कुंकू वहावे) श्री महागणपतये नमः । ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । सिन्दूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा) श्री महागणपतये नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात) श्री महागणपतये नमः । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे) श्री महागणपतये नमः । दूर्वाङ्कुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात) श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी) श्री महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे) उजव्या हातात २ दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावेत. प्राणाय नमः । अपानाय नमः । व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।।
श्रीविष्णुस्मरण
दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो’ म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।’ असे म्हणावे
कलशपूजन
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.
शंखपूजा
शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।। अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो
घंटापूजा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।। अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो. घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
दीपपूजा
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: । आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध, अक्षता अन् फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळद-कुंकू वहाण्याचीही पद्धतही आहे)
मंडपपूजन
पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि’ या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे. मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। स्थलशुद्धी अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।। अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.